स्वच्छता 'त्या' दिवसातली

बोलायचे आहे अशा स्वच्छतेविषयी जिथे नेहमीच बोलण्यास लाजल्यासारखे होते

प्रा. अलोक अर्जुन अलका पवार 

आज २८ मे, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा एक चित्रपट 'पॅडमॅन' आला आणि आपण तो पाहिला, अक्षय कुमार ने घेतलेल्या मोठ्या पावलावर बऱ्याच ठिकाणी चर्चादेखील झाली. आम्ही अगदी गावामध्ये हा चित्रपट मोठा पडदा लावून दाखवला पण. मात्र आजही भारतात, प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात देखील सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी, त्या काळातील स्वच्छता या बाबतीत बोलणे, बहुतांशी शाळा महाविद्यालयांंत शिक्षण सोडा मात्र घरी देखील अशा चर्चा या अगदी वाळीत टाकणाऱ्या समजल्या जातात. 

मध्ये जीएसटी सुरू झाला तेंव्हा पुण्यामध्ये हुजूरपागा महिला महाविद्यालयात एक चर्चा सत्र आयोजित केले होते. त्यामध्ये आम्ही एक पेपर सादर केला होता. सरकारने बऱ्याच गोष्टींवर जीएसटी लावला होता. त्यामध्ये सॅनिटरी पॅडवर देखील जीएसटी लावला होता आमचा संशोधन पेपर त्यावरच आधारलेला होता. सॅनिटरी पॅडवर एक पुरुष पेपर सादर करतोय तोही चक्क महिला महाविद्यालयात. बऱ्याच मुली बोलायला तयार नव्हत्या. हेच होते नेहमी की या बोलण्यातून कुठेतरी प्रायव्हसी सारख्या गोष्टींवर बोलल्या सारखे वाटते. मग त्यामध्ये पुरुषांनी का कसे कधी कुणासमोर बोलावे या अनेक प्रश्न पुढे येते. त्यातूनही आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धांच मोठे ओझे भारतासारख्या देशात वाहतो आहे. जाऊदे सध्यातरी आपण या सर्व गोष्टी बाजूला ठेवू आणि या स्वच्छतेविषयी बोलूयात. 


नक्की २८ तारखेलाच का आपण हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, हे देखील जाणणे गरजेचे आहे. स्त्रियांची मासिक पाळी ही साधारण २८ दिवसांच्या चक्राने पुन्हा येत असते. आणि म्हणूनच २०१४ पासून एका बिगरशासकीय संस्थेने हा उपक्रम सुरु केला. 

शहरातील बऱ्यापैकी स्त्रिया, शिक्षण सोई आणि पुढारलेल्या योजनांमुळे सॅनिटरी पॅड काय असते? ते कसे वापरावयाचे? या सर्व गोष्टींशी अवगत झालेल्या आहेत. मात्र खेडेगावात अजूनसुद्धा सॅनिटरी पॅड वापरणे याबाबत अज्ञान दिसून येते. खेडेगावात बऱ्यापैकी जी दुकाने उपलब्ध आहेत तिथे एखादी महिला जाऊन अशी एखादी गोष्ट विकत मागते आहे हे अतिशय लज्जास्पद समजले जाते. त्यामुळे बऱ्याचश्या दुकानांमध्ये सॅनिटरी पॅड सारख्या गोष्टी विक्रीसाठी देखील उपलब्ध नसतात. 



मी ज्या संशोधन पेपरविषयी वर बोललो तो पेपर सॅनिटरी पॅडवर केंद्र सरकार जीएसटी कर का आकारु शकतो? या गोष्टीवर आधारभूत होता. म्हणजे स्त्रियांच्या शृंगारसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्यांना जीएसटी सारखा कर नाही, मात्र जिथे स्त्रियांच्या आरोग्याविषयी किंवा अति- स्वच्छतेविषयी चर्चा करण्याची गरज आहे. तेथे मात्र आपण कर भरतो आहे जी अतिशय चुकीची गोष्ट आहे. कर नाहीच मात्र सॅनिटरी पॅड सारख्या गोष्टी स्त्रियांना पूर्णपणे मोफत मिळाल्या पाहिजेत. जसे प्रतिमहिना रेशन च्या दुकानात गहू - तांदूळ मोफत भेटतो त्याच धर्तीवर घरातील स्त्रियांच्या संख्येनुसार योग्य त्या प्रमाणात सॅनिटरी पॅडची देखील वितरण व्यवस्था असलीच पाहिजे. तरच भारतातील ग्रामीण भाग या स्वच्छतेशी मिळताजुळता होईल. गावामध्ये प्रजनन क्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'आशा' कार्यरत असतात. त्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. महिलेचे आरोग्य आणि बालकाचे आरोग्य हे फक्त स्त्री गरोदर असणे किंवा प्रसूत झाल्यावरच लक्ष देण्यासारखे असते असे नाही तर या चार दिवसातही लक्ष देण्यासारखे असते. मात्र यावर स्त्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागातील कोणत्याही प्रक्रारे बोलताना दिसत नाही. काही त्रास असेल तर डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणे या स्त्रिया पसंत करीत नाहीत. आणि त्यामुळेच अनेक आजारांना या सामोरे जाताना दिसतात. त्यामुळे अनेक होर्मोनल बदलांना या स्त्रिया सामोरे जाऊन चीड-चीडेपणा, प्रामुख्याने पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा विविध आजारांना सामोरे जावे लागते. शिवाय ज्या ठिकाणहून रक्तस्त्राव होतो अशा योनीमार्गात देखील इन्फेक्शन होण्याच्या संभावना असतात. अंगावरून पांढरे पाणी जाणे अशा समस्या देखील होऊ शकतात. अगदी खाजेसारख्या समस्या उत्भवून त्वचा रोगांना पण आमंत्रण दिले जावू शकते. 

आता स्वच्छता पाळायची म्हणजे नक्की करायचे तरी काय? तर सर्वात प्रथम गुणवत्तापूर्ण सॅनिटरी पॅड निवडून पाळी येण्याच्या आधी त्याची खरेदी करणे. या गोष्टी करण्यासाठी काही लाजण्यासारखे किंवा अगदी दुकानदाराकडे या गोष्टी कशा मागाव्यात हा संकोच देखील करणे अयोग्य आहे. कारण आपण या गोष्टीची मागणी करतोय म्हणजेच आपण आपल्या किंवा आपल्या परिवारातील स्त्रीच्या शारीरिक स्वच्छतेसाठी करतोय हे लक्षात घ्यावयाचे आहे. ही झाली पहिली पायरी. 

बऱ्याचशा ग्रामीण आणि अगदी शहरी भागातील स्त्रिया काही फडकी धुवून पुन्हा तीच वापरणे किंवा राख वापरणे अशा गोष्टी वापरण्यास पसंती देतात, त्याऐवजी आपण सॅनिटरी पॅड वापरणे याला प्राधान्य दिला पाहिजे. आणि शक्यतो मुलींनी आपल्या आईशी आणि त्याच प्रकारे आईने आपल्या मुलींशी या बाबतीत तरी योग्य ती चर्चा योग्य वेळी केली पाहिजे. यात कोणताही संकोच बाळगता कामा नये. 

स्वच्छतेसाठी स्त्रियांनी या दिवसांत स्वच्छ अंघोळ करणे शक्य असल्यास दोनदा केली तरीही चालेल. अंघोळीस गरम पाण्याचा वापर केल्यास अतिउत्तम. अंघोळ झाल्यावर संपूर्ण शरीर कोरडे ठणठणीत करणे देखील गरजेचे असते. दर पाच तासांनी वापरलेला सॅनिटरी पॅड बदलणे अत्यावश्यक आहे. आता बऱ्याच मुलींना वापरलेला सॅनिटरी पॅड कागदामध्ये ठेवून कामाच्या, शिक्षणाच्या किंवा अन्य ठिकाणी बाळगून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकणे यातही मोठी लाज वाटत असते. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यानींनी स्त्री शिक्षिकांच्याबरोबर अडचणीच्या प्रसंगी बोलणे यातही संकोच करू नये. बऱ्याचदा शाळा महाविद्यालयांमध्ये ई सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डीस्पोजल मशीन्स ची उपलब्धता असते. स्त्रियांनी आपली अंतर्वस्त्रे देखील ठणठणीत कोरडी असतील अशीच वापरणे अनिवार्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही प्रकारे दमट अशी अंतर्वस्त्रे शक्यतो मासिक पाळीच्या दिवसात वापरू नये. 

आता दर ५ तासांनी का सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे हे देखील समजवून घेऊ. आपण चिकन - किंवा माशांच्या दुकानात पाहिले तर तेथील पाण्यावर बऱ्याचदा माशा फिरताना दिसतात. या माशा आकाराने मोठ्या असतात म्हणून दिसतात. मात्र याच पाण्यामध्ये बरेच जंतू देखील असतात जे आकाराने सूक्ष्म असतात. ज्या वेळी योनी मार्गाने मासिक पाळीच्या दिवशी रक्त बाहेर सोडले जाते तेंव्हा त्या ठिकाणी जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी अधिक किती प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे यापेक्षा पुन्हा पुन्हा सॅनिटरी पॅड बदलणे हे देखील गरजेचे आहे. याची बदली करताना योनी मार्गाची स्वच्छता व त्यानंतर हातांची देखील साबणाने धुवून स्वच्छता करणे गरजेचे आहे.  

कधी कधी अधिक रक्तस्त्राव झाल्यास व योग्य वेळी सॅनिटरी पॅड न बदलल्याने रॅश होऊ शकतात. त्यामुळे जर रक्तस्त्राव अधिक असेल तर पाच तासांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड लगेच बदलणे गरजेचे आहे. तसेच रॅश झाल्यास जंतूसंसर्ग पावडर किंवा मलम लावणे. शक्यतो ओलावा न येण्यासाठी पावडर वापरणे योग्य ठरते. मात्र जंतुसंसर्ग अधिक वाढल्यास संपूर्ण योनी मार्गाला देखील धोका संभवू शकतो. ट्युब्सला देखील त्रास होऊ शकतो.                

वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट देखील योग्य करणे गरजेचे असते. त्याला कचरा पेटीतच टाकणे गरजेचे असते. कचरा पेटीत टाकताना त्याला वर्तमान पत्रात ठेवून विल्हेवाट लावावी. तसेच नगरपालिकेची कचरापेटी  किंवा घंटागाडी असल्यास त्यांच्याकडे बाजूला एक वेगळी सोय असते. ग्रामीण भागात उकिरड्यावर किंवा उघड्यावर हे न फेकता एक वेगळा खड्डा करून त्यात आपण टाकू शकतो, किंवा जाळू शकतो. आशा यांच्या मदतीने कायमस्वरूपी काही विल्हेवाट करण्यासाठी सोय होऊ शकते का या देखील गोष्टी गावाच्या सांघिक  विकासाच्या बाबतीत चर्चिल्या जावू शकतात. 

या सर्व स्वच्छतेच्या गोष्टी बाकी कोणी नाही तर निदान आपल्या आईशी योग्य वेळी बोलणे गरजेचे आहे. 

तर चला या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊयात. सर्व स्त्रियांना आजच्या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या शुभेच्छा!

स्वच्छ राहा! खुशहाल राहा!! 

   

Comments

  1. २८ में जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन मानला जातो...त्याबद्दल आपल्याकडे खूप कमी बोलले जाते. पण त्यावर बोलण्याचे... त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगण्याचे धाडस तू केले आहेस आलोक
    आणि हा एक प्रकारे 'स्त्री सन्मान च' आहे.
    तू अगदी २८ तारिखच का निवडली, येथपासून पाळीचे मासिक चक्र, त्यासंबंधी अस्वच्छतेमुळे होणारे आजार त्याचे गांभीर्य ही सांगितले. शिवाय तो खासगी विषय समजून अनेक स्त्रिया लाजतात आणि आजार ओढवून घेतात..या विषयीची खूप विस्तारपूर्वक माहिती दिलीस...अगदी सॅनिटरी पॅड वर लावला गेलेल्या जीएसटी बद्दलही अभ्यासपूर्ण विचार मांडला... आणि ते अगदी यथायोग्य आहे की सॅनिटरी पॅड...खरं तर मोफत मिळाले पाहिजेत...रेशनिंगच्या धान्यकोट्याप्रमाणे...तेही घरातल्या स्त्रीयांच्या संख्येनुसार....हा तुझा विचार खूप स्तुत्यच आहे..कारण हे सरकारने अमलात आणले तर स्त्रियांच्या आरोग्याची सुधारणा होईल आणि स्वच्छतेच्या सवयी ही लागतील..
    तुझा आणखी एक मुद्दा ते disposable..करण्याचा..त्यांचेही तू व्यवस्थित विश्लेषण केलेस..
    मुली.. स्त्रिया यांचे पाळीतली अस्वच्छता आणि त्यामुळे होणारे गंभीर आजार हे त्यांच्या प्रजनन संस्थेवर ही घातक परिणाम करू शकतात...तेव्हा वेळीच खेडोपाडी ही याबद्लचे अभियान राबवले गेले पाहिजे...
    अलोक...तुझा हा लेख आणि त्यावर बनवलेला व्हिडिओ ह्याचा निश्चितच चांगला परिणाम होऊ शकतो...तुझ्या हा लेखातून ही तळमळ जाणवते की या देशातली मुलगी ही भावी माता आहे... आणि तिचे आरोग्य खूप मौल्यवान आहे....तुझा लेख म्हणजे एक प्रकारे...'स्त्री आरोग्याचा जागर' च आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मावशी.... या विषयी ग्रामीण भागात मी काम करायला सुरुवात केली आहे. आम्ही जेंव्हा जेंव्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी गावात घेऊन जातो तेंव्हा गावातील दुकानांमध्ये, महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन करतो, बऱ्याच ठिकाणी लाज हा प्रकार बऱ्यापैकी जाणवतो म्हणजे आजारी पडायचे पण लाज maintain ठेवायची त्यातून बाहेर पडण्यासाठी हे प्रबोधनाचे प्रयत्न.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....

पर्यावरण दिन