पर्यावरण दिन

पर्यावरण दिन : ५ जून 

प्रा. अलोक पवार 

आज ५ जून च्या निमित्ताने जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. आपण बालपणीपासून पर्यावरणाचा अभ्यास करत आलोय. अगदी हिरवे हिरवे गार गालीचे... अशा कविता देखील म्हणल्या आहेत. मग अगदी दहावीपर्यंत असो किंवा महाविद्यालयातील तो एक विषय असो सर्वांमध्ये आपण 'पर्यावरण' या विषयाचा अभ्यास केलाच केला. मात्र तरीदेखील आजचा दिवस आपण मोल्यवान समजतो आणि आजकालच्या मोबाईल अवेअरनेसच्या जमान्यात स्टेटसला ठेवण्यासाठी का होईना, आपण पर्यावरण दिन साजरा करतो. मी तर म्हणतो केलाच पाहिजे. करणे भागच आहे. नाहीतर आज जी आपण कोरोनाची परिस्थिती पाहतोय ती अजून कुठेतरी गंभीर झाली असती. का ते तुमच्या हा लेख वाचल्यावर लक्षात येईलच. आपल्याला पर्यावरण म्हणजे घराबाहेर पडलो तर झाडे दिसायला लागली, जंगलात गेलो तर डोळ्यांना दिसणारा हिरवागार निसर्ग किंवा स्वच्छ नद्या समुद्र इतकेच नाही तर आपल्या सभोवताली जे जे काही आहे तो सर्व पर्यावरणाचा भाग आहेत. अगदी आपल्या नाकपुड्यांद्वारे आपण श्वास घेतो तेथे देखील स्वच्छ पर्यावरण म्हणजेच प्राणवायू असतो नाहीतर आपली परिस्थिती त्या व्यक्तीसारखी असती जो व्यक्ती आजही आयसोलेशनच्या ठिकाणी विकतच्या ऑक्सिजनच्या नळ्या नाकाशी घेऊन बसतो आहे.    

५ जून १९७४ मध्ये सर्वप्रथम युनायटेड नेशन्स ने हा पर्यावरण दिनाची सुरवात केली. आणि तेंव्हापासून आज पर्यंत हे पर्यावरण दिन साजरे केले जात आहेत. मग सागरी प्रदूषण, वाढती लोकसंख्या, तापमान वाढ, वन्यक्षेत्रात घडणारे गुन्हे असे बरेच विषय या पर्यावरण दिनाच्या दिवशी हाताळले जातात. आणि दरवर्षी प्रत्येक देशाकडे या दिनाची जवाबदारी दिली जाते. बऱ्याच देशांनी आजतागायत ही जवाबदारी स्वीकारून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही किंवा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत असणारे ज्वलंत विषय जगासमोर मांडले आणि कुठेतरी पर्यावरण जोपासण्यास मदत केली. मग आत्तापर्यंत हा मान स्वीकारला. यामध्ये केनिया, कॅनडा, चीन, ब्राझीलम बेल्जिअम, स्वीडन, साउथ आफ्रिका, टर्की, कोरिया, स्पेन, इटली, मंगोलिया, थाईलंड, असे बरेच देश यात सहभागी झाले. आश्चर्याची बाब म्हणजे बांग्लादेश ने आत्तापर्यंत वेळा या दिनाचे नेतृत्व केले. पाकीस्थान ने देखील यापूर्वी दोन वेळा नेतृत्व केले. आपल्या भारताने नेतृत्व दोन वेळा केले. २०११ मध्ये आपण जंगल हा विषय घेऊन तर २०१८ मध्ये प्लास्टिक प्रदूषण हा विषय घेऊन हा दिन साजरा केला. एक हास्यास्पद विषय या ठिकाणी नमूद करतोय, आपलाच नाही संपूर्ण जगाचा शत्रू देश म्हणजे चीन यांनी २०१९ साली पर्यावरण दिनाचे स्वामित्व घेतले, त्यांनी वाढते हवा प्रदूषण हा विषय घेतला होता. म्हणजे जून महिन्यात त्यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी संपूर्ण जगासमोर आदर्श प्रस्थापित करण्याचा विचार मांडला. आणि डिसेंबर महिन्यात तीच हवा कोरोना महामारीमुळे प्रदूषित कशी होईल हे देखील पहिले. मात्र याच कोरोनामुळे पुढील ही दोन वर्षे आपण वेगळ्या परिस्थितीमध्ये जगतो आहे. यंदा २०२१ मध्ये पाकीस्थान हा देश या पर्यावरण दिनाचे स्वामित्व करतो आहे. यासाठी नक्कीच आपण पाकीस्थान सारखा देश असला तरीही त्यांना किंवा आजच्या विषयाला साकारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या वर्षीचा विषय आहे, 'परिसंस्था पुनर्निर्मित करणे' (Ecosystem Restore). यासाठी आपल्याला परिसंस्था म्हणजे नक्की काय हे समजून घेतले पाहिजे. आपण ज्या अधिवासात राहतो, तो अधिवास आपल्याला आपल्याला तिथे निवास, अन्न, राहण्यास योग्य पोषक असे वातावरण निर्मिती करीत असतो. मात्र काहींच्या बाबतीत हे होत नाही कारण तेथील परिस्थितीकी संस्था ही काही गोष्टींमुळे बिघडत जाते आणि कालांतराने नष्ट होते. या सर्व गोष्टी पुनर्निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी आजचा दिनाचे महत्व. 



आज बऱ्याच शहरी किंवा निवासित भागांमध्ये जंगली प्राणी शिरल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. आणि याचे कारण म्हणजे जंगलांमध्ये या प्राण्यांना अन्नासाठी असणारा तुटवडा. याच्या गोष्टीच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला असे का घडते आहे याचे कारण नक्की भेटेल. वाढते शहरीकरण आणि त्यासाठी जी जंगलतोड होत आहे त्यामुळे ही वन्य परिस्थितीकी कुठेतरी बिघडली आहे. आणि म्हणूनच हे प्राणी मनुष्य वस्तीत येताना दिसतात. एक झाड तोडले तर त्याच्या आधार घेऊन राहणारे पक्षी तसेच त्याच्या मुळाशी राहणारे असंख्य जीव हे बेघर होतात. कदापि ते मृत देखील होत असतील. काही जीवाश्माचा तर यांसारख्या गोष्टींतून नाश देखील होत असेल. त्यामुळे या विषयाचे महत्व आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. तुळशी बागेत किंवा शोच्या दुकानात बरीच मंडळी खोटी झाले फुले घेऊन सुशोभीकरणाचे प्रयत्न करीत असतात. ख्रिस्तमस मध्ये खोटा खोटा ख्रिस्तमस ट्री घेऊन त्याला सजवले जाते. इतकेच काय जून महिन्यात ५ जून नंतर याच महिन्यात वटपोर्णिमा येते. त्यावेळी एक अनोखा प्रकार बाजारामध्ये बघायला भेटतो. बरेच जन वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून विकायला बसले असतात. बायका या वडाच्या फांद्या विकत घेऊन घरी कुठेतरी बांधतात आणि त्यालाच फेऱ्या मारतात. आणि दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकूनही देतात. खर तर निदान ख्रिस्तमस आणि वटपोर्णिमा या सणाच्या निमित्ताने का होईना ही मोठी झाडे जोपासली गेली ना तर पर्यावरण राखले जाईल. 

वाढत्या कचऱ्याचा देखील या परिस्थितीकीवर घातक परिणाम दिसून येतो आहे. कचरा हा कोणत्याही स्वरूपाचा असल्याने तो ज्या भागात वाढतो तेथील सूक्ष्मजीव नाश पावतात, किंवा विघटन प्रक्रियेस अडचण निर्माण होते. प्लास्टिक मुळे वेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे फक्त आजचाच दिवस लक्षात न घेता आपण कशा प्रकारे या परीसंस्थेला पुनर्निमित करण्यात मदत करू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी एक वेगळी संकल्पना शैक्षणिक वर्ष २०२० - २१ पासून सर्वांसमोर मांडली ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावायचे आणि त्या झाडाला जोपासायचे. या मोहिमेसाठी अगदी अधिकचे गुणदान देखील विद्यापीठ विद्यार्थ्याला करणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त झाडे लावली जातील असा मानस विद्यापीठाचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी २०१९ मध्ये एक विश्वविक्रम केला होता. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने विद्यार्थ्यांना कडूलिंबाची रोपे वाटली होती. आणि मला अगदी अभिमान आहे की या मोहिमेमध्ये चालताना माझ्या हातात पहिले रोप होते. 

जर प्रत्येकाने एक जरी वृक्ष लावला तर ही परिस्थितीकी सावरेलच. शिवाय सध्या कोरोनाच्या महामारीत जो प्राणवायू कमी पडतो आहे, विकत घ्यावा लागत आहे, तो काहीसा एका योग्य दिशेने वाढेल. जागतिक तापमान वाढते आहे त्या शंकेचे देखील समाधान होईल. आजच्या विषयाला अनुसरून युनायटेड नेशन्स ने साउथ आफिकेच्या आदिवासी भागातील लोकांचे हसतमुख चेहरे जगासमोर आणले आहेत. हे सर्व आदिवासी त्या भागामध्ये मग तो मैदानी भाग असेल किंवा डोंगराळ भाग असेल तेथील जे वृक्षतोडीमुळे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी सक्षम झाले आहेत. ते वृक्षांची अगदी शेतीच करत आहेत असे देखील म्हणावयास हरकत नाही. त्यांनी बऱ्याच वन्य वृक्षांची लागवड केली आहे आणि २०३० पर्यंत त्यांनी नष्ट झालेली परिस्थितीकी पुनर्निमित करण्याचा मानस डोळ्यासमोर धरला आहे.             

चला आपण पण निश्चय करू एक तरी झाड लावूयात त्याला जोपासुयात. त्या झाडावर येणाऱ्या पशुपक्षांचे मधुर आवाज एकुयात. त्या झाडाला खतपाणी घालूयात. एक परिस्थितीकी निर्माण करण्यास मदत करूयात. 

५ जून २०२१                 

Comments

  1. खूप छान लेख आहे.पर्यावरणाचा -हास मोठ्या प्रमाणावर होत आहे.पारिस्थितीकी संतुलन राखायचे असेल ,सर्वांना सुखी ,आनंदी जीवन जगायचे असेल.कोरोनासारख्या महामारीतून मुक्त व्हायचे असेल तर प्रत्येकाने एक झाड आपल्या दारी लावलेच पाहिजे आणि त्याची जोपासनाही केली पाहिजे...खूप मोलाचा संदेश या लेखातून अलोक पवार सरांनी दिला आहे...धन्यवाद !!!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही आंबा वैगरे लावा म्हणजे मी आल्यावर मला आमरस पुरी पण खायला देताल आई...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वच्छता 'त्या' दिवसातली

वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....