विधाते सरांचा वाढदिवस आणि वृक्षारोपण
डॉ. हरिदास विधाते सरांचा वाढदिवस आणि वृक्षारोपण
© प्रा. डॉ. अलोक पवार
साधारण ३ ते ४ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझा विद्यार्थी आकाश सावित्रीबाई फुले विद्यापीठच्या परीक्षा नियंत्रक शालिग्राम सर यांना भेटलो होतो. आकाश ने ठरवून त्यांना गाठून गावातल्या अडचणी सांगून काही उपाय मिळतो आहे का यावर चर्चा निश्चिती केली होती. आमच्याकडे गावाला पाऊसच पडत नही, नुसता कोरडा दुष्काळ, मग आम्हा युवकांचे सर्व प्रश्न, पुण्याला जायचे का, शेती तशीच ठेवायची का... आकाश ने बऱ्याच अडचणी मांडल्या होत्या. सरांनी सर्व समजून घेऊन त्याला एक प्रश्न विचारला जो पाऊस अगदी थोडाफार पडतो त्याचे तुम्ही काय करता, त्याच्या पाण्याचे तुम्ही काय करता. त्या पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही काय करता?
आकाश आणि अगदी मी दोघेही निरुत्तर होतो. असणाऱ्या गोष्टींची किंमत नसते ना... तर त्या पावसाच्या थेंबाचे करणार काय? शालिग्राम सरांनीच आम्हाला एक उपाय सांगितला होता. पावसाचे पाणी जमिनीवर पडले तर अधिक तापमानामुळे पाण्याचे आर्दतेत रूपांतर होते. आणि पाणी गायब. तेच पाणी आपल्या भुगर्भात काही दिवस राहू शकते त्याला पर्याय म्हणजे अशी झाडें लावायची जी कमी पाण्यात भराभरा वाढतील. एक पर्यायी आणि बहू फायद्याचे झाड म्हणजे शेवग्याच्या शेंग्याचे झाड. एकंदरीत वृक्षारोपण हा या दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रभावी मार्ग.
आकाशमुळेच त्याच्या गावाकडच्या घराजवळ कोणते कॉलेज आहे, हे बघता बघता आनंदराव धोंडे कॉलेज उर्फ बाबाजी महाविद्यालय सापडले आणि त्या कॉलेज मध्ये चक्क एक राष्ट्रीय कॉन्फरेन्स होती. मी आणि आकाश ने नॅक च्या आधारावर एक संशोधन पेपर लिहून पाठवला. पेपर निवडला जाईल याची आम्हाला खात्री होती. आणि काय दुष्काळी गावातल्या कॉलेज मध्ये जाऊन पेपर वाचायचा आहे काय अवघड असणार, असे मनाचे तारे आम्ही तोडले होते. पण कडा, आष्टी, बीड चा दुष्काळ एकीकडे आणि महाविद्यालयाचा लवाजमा एकीकडे. राष्ट्रीय कॉन्फरेन्स साकारताना शहरातील भव्यदिव्य महाविद्यालयांना लाजवले जाईल असे अगदी पोषक वातावरण त्या महाविद्यालयच्या त्या कॉन्फरेन्स हॉल मध्ये होते. सर्व शिक्षक मंडळी अगदी सुटकोट अशा वेषात होती. कॉन्फरेन्स ची नोंदणी, पेपर प्रेझेंटेशन ते आदरातिथ्य हे सर्वच अगदी एखाद्या विद्यापीठच्या पातळीवरील वाटत होते. मला तेथील प्राचार्यांना भेटावेसे वाटले, त्यांना भेटून त्यांच्या कॉन्फरेन्स ची तारीफ त्यांच्याकडे करायची होती. 'सर वेळ आहे का बोलायला थोडा आम्ही पुण्याच्या एका कॉलेज मधून आलोय ?' सर वरच्यावर बोलतील असे वाटले पण सरांनी त्यांच्या कॉन्फरेन्स च्या गडबडीतही त्यांच्या केबिन मध्ये बोलावले आमच्याशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या बाबतीत काही सुधारणा सुचवाव्याश्या वाटतात का असेही विचारले. हे प्राचार्य म्हणजे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील वाणिज्य शाखेचा एक बुलंद आवाज. सरांनी वाणिज्य शाखेच्या अधिष्ठाता पदावर देखील काम केलेले. कडा आष्टी या दुष्काळी भागात विद्यार्थ्यांसाठी वरदान म्हणून हे आनंदराव धोंडे महाविद्यालय कार्यरत आहे. गावातला विद्यार्थी गावातच राहावा त्याने स्वतः च्या विकासासाठी किंवा शहरी मोहापायी गाव सोडून शहरात येऊ नये या दूरदृष्टी प्रणाली वर सरांचे कार्य चालते.
सरांनी नुकतीच त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केली. वाढदिवस म्हणजे बायका पोरांना घेऊन फिरायला जाणे किंवा खडाजंगी पार्टी करण्याचा मोह प्राचार्य पदाला होऊ शकतो, मात्र मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या गावासाठी काहीतरी करायचे आहे या प्रामाणिक उद्देशाने सरांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये एक - दोन नाही तर माझ्या वयाच्या आकड्यामध्ये अधिकचे १०० करून १५८ झाडे लावण्याचा विक्रम सरांनी केला. जमलेल्या सर्व ग्रामस्थ्यांकडून, त्यातील ठराविक विद्यार्थ्याकडून त्या झाडांची भविष्यात वाढ होईपर्यंत निगा राखण्याचे आश्वासन पण सरांनी घेतले.
आपण केलेले हे कृत्य विद्यार्थ्यांच्या मनात काय बिंबवतील सर. खरे तर तुम्ही त्या ग्रामीण मातीवर प्रेम करता हे दिसले. तुमचे विद्यार्थी नक्कीच त्यांच्या आई - वडिलांचा वाढदिवस अशा वेगळ्या उपक्रमातून करता येईल का याचा देखील विचार करतील. सर तुम्ही वाणिज्य शाखेतील असूनही प्राचार्य हा एका ठराविक शाखेचा नसून तो बहुशाखीय असतो, त्यामुळे तुम्ही पर्यावरण शास्त्रचेही आहात हे तुमच्या कृतीतून दाखवून दिले. सर तुम्ही झाडे लावली त्यातही तुम्ही वड, पिंपळ अशी गरजेची झाडे निवडली त्यामुळे तुम्ही तुमच्यातले वनस्पती शास्त्र जागे केले. सर शालिग्राम सरांच्या तोडग्याने जर झाडे वाढली तर बाषपीभवन होणार नाही, तापमानवाढ होणार नाही, सर बघा भूगोलाचा पण तुमचा अभ्यास समोर आलाच की. सर एकूण काय झाडे वाढतील, ग्रामीण भागातले वातावरण आधीच पोषक असते त्यामध्ये लोकांना अजून टूमटूमित ठेवण्याचे काम तुमच्याकडून होईल, बघा सर तुमच्यातल्या आरोग्यशास्त्र अभ्यासक पण तुम्ही जागा केला. सर तुमच्या याच प्रयत्नांनी कदाचित गावाकडची मंडळी शहराकडे येण्याचे टाळतील, ग्रामीण वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न ठेवतील, सर बघा तुमच्यातला अर्थशास्त्रज्ञ हे करतोय. आणि शेवट काय सर तुमचे विद्यार्थी गावातच राहून उपजीविकेची साधने शोधतील, उद्योजक बनतील तिथेच खरेदी - विक्री होईल, सर वाणिज्य व व्यवस्थापनाचा तुम्ही बारीक सारीक विचार करता हे सहज दिसून येते.
सर कृती तुमची फक्त झाडें लावण्याची पण तुम्ही आपल्या ग्रामीण भागाला किती मनापासून त्याला जोपसले हे सहज दिसले. या ग्रामीण भागाला तुमची, तुम्ही भविष्यात जोपसलेल्या विचारांची आपल्या गावाला कडा, आष्टीला, बीड ला भरपूर गरज आहे, त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना..



Comments
Post a Comment